नागपूर (वृत्तसंस्था) – नागपूरात अवघ्या एका पुरीसाठी एका मजुराची हत्या झाली आहे, तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला आहे. लकडगंज पोलीस स्टेशन अंतर्गत आज पहाटे साडे तीनच्या सुमारास ही घटना घडली आहे.
लकडगंज परिसरात मेहता पेट्रोल पंपाजवळ काल रात्री एका संस्थेकडून लॉकडाऊनमुळे परिसरातील मजूर आणि रस्त्यावर राहणाऱ्या बेघरांना जेवणाचे पाकीट वाटण्यात आले होते. त्यावेळी विनोद मोखे नावाच्या एका सिक्युरिटी गार्डला मिळालेल्या जेवणाच्या पाकिटात पुरी नव्हती. तेव्हा विनोदने ही बाब सहकारी मजुरांकडे सांगितली. लालचंद मेंढे आणि कंडक्टर नावाच्या दोन मजुरांनी त्याची टिंगल उडवत त्याला भिकारी असे संबोधले आणि आपल्या पाकीटा मधील पुरी विनोदला खाण्यासाठी दिली.
लालचंद आणि कंडक्टर या दोघांनी आपले अपमान केले. या रागातून विनोद मोखे याने रात्री अडीच वाजताच्या सुमारास लोखंडी रॉडने झोपलेल्या लालचंद आणि कंडक्टर या दोघांच्या डोक्यावर वार करत लालचंदची हत्या केली. तर कंडक्टरला जबर जखमी केले. त्यानंतर आरोपी विनोद ने स्वतः लकडगंज पोलीस स्टेशन गाठून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी आरोपी विनोद मोखेला अटक केली असून दारुच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे.







