मुंबई (वृत्तसंस्था) – एका एका संख्येने वाढता कोरोना रुग्णांचा आकडा बत्तीसवर गेला आणि शहरांची धाकधुक वाढू लागली. पनवेल संघर्ष समितीने कामोठे येथील एमजीएम रुग्णालयाला कोविड दर्जा देण्याची मागणी करून जिल्हा ते राज्याच्या आरोग्य खात्याकडे पाठपुरावा केला. त्या मागणीला यश आले असून अडीचशे खाटांच्या दालनाला जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आज परवानगी दिली आहे.पनवेल महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्ण हळुहळु वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने उपजिल्हा रुग्णालयात शंभर खाटांची व्यवस्था करून कोविड रुग्णांसाठी महापालिकेकडे वर्ग करण्यात आला. तिकडे आता 32 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापुढे पनवेल महापालिका वगळता रायगड जिल्ह्यात अन्य ठिकाणी रुग्ण आढळल्यास येथे आणण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आणि उलवे येथील 4 तर उरण येथील 2 रुग्णांची भर्ती करण्यात आली. जास्त रुग्ण वाढल्यास वैद्यकीय यंत्रणेवर ताण येऊ नये म्हणून पनवेल संघर्ष समितीचे पत्रव्यवहार केला होता.दीडशे खाटांची कामोठे एमजीएममध्ये कोरोना रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. ती पुढे अडीचशे खाटांपर्यंत वाढवण्याची तजवीज करण्यात आली आहे. त्यात अतिदक्षता विभागात वीस खाटांची 10 व्हेंटिलेटरसह व्यवस्था करण्यात आली आहे