औरंगाबाद (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे पहिले राज्य अधिवेशन, राज्यस्तरीय शिक्षण परिषद तसेच राज्यातील शिक्षक, साहित्यिक, केंद्रप्रमुख ,शिक्षण विस्ताराधिकारी, पत्रकार, समाजसेवक, संघटनात्मक कार्य करणारे व सहकार आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्यांचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा शैक्षणिक गुणवत्ता वाढ जिल्हा परिषद शाळा विकास परिसंवादासह 11 ते 13मार्च दरम्यान राज्य शासनाची परवानगी घेऊन कर्तव्य रजेसह मान्यवरांच्या उपस्थितीत शैक्षणिक गुणवत्ता वाढ जिल्हा परिषद शाळा विकास परिसंवादासह औरंगाबाद येथे होणार होता. खबरदारीचा उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,आरोग्यमंत्री राजेश टोपे, शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील आदींच्या सुचनेनुसार तूर्तास अधिवेशन स्थगित करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दीं टाळून खबरदारी म्हणून सर्वांनी पुढे येण्याची गरज असून अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी काळजी घेणे गरजेचे असल्याने महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाने हा निर्णय घेतला असे आयोजक प्रवक्ते किशोर पाटील कुंझरकर यांनी म्हटले. राज्य अधिवेशन व पुरस्कार सोहळा तूर्तास स्थगित करण्यात आला असून भविष्यात राज्य शासनाच्या कर्तव्य रजेसह पुन्हा घेऊ या संदर्भात शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी राज्य समता शिक्षक संघाला आश्वासित केल्याचेही त्यांनी सांगितलेे. केवळ खबरदारीचा उपाय म्हणून तूर्तास अधिवेशन स्थगित करण्यात आले आहे. शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आपल्या संघटनेचे कर्तव्य असून अधिवेशन तूर्तास स्थगित झाल्याने होणार्या त्रासाबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.