नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – जगभरात कोरोना व्हायरसची भीती आणि त्यात सौदी अरेबिया आणि रशिया यांच्यातील तेलयुद्धामुळे सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दरात ऐतिहासिक घसरण झाली आहे. विशेष म्हणजे जानेवारी 1991 मध्ये कच्च्या तेलाचा प्रतिबॅरल दर ज्या वेगाने कोसळले होते. त्याच वेगाने आत्ता दर खाली आले आहेत. ब्रेंट कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल 31. 01डॉलर इतके खाली आले आहेत. या कंपनीच्या कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल 14.25 डॉलरने अर्थात 31.5 टक्क्याने कमी झाले आहेत. 17 जानेवारी 1991 मध्ये इतक्याच मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाचे दर उतरले होते. त्यावेळी आखाती युद्धामुळे तेलाचे दर कोसळले होते. रशियाला धडा शिकविण्यासाठी सौदी अरेबियाने तेल उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबिया हा जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश आहे. कोरोना व्हायरसचा जगातील 60 पेक्षा जास्त देशांमध्ये वेगाने फैलाव झाल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. या पार्श्वभूमीवर ओपेकने तेलाच्या उत्पादनात घट करण्याचा निर्णय घेतला. ओपेकमध्ये सहभागी आणि इतर देशांनीही जागतिक अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी याला पाठिंबा दिला आहे. पण त्याचवेळी सौदी अरेबियाने रशियाला धडा शिकवण्यासाठी एप्रिलपासून तेल उत्पादन प्रतिदिन एक कोटी बॅरलने वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.