नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशातील कोळसा उत्पादन वाढीवर भर दिला जाणार असं निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. या कोळसा उत्पादन क्षेत्राच्या सुधारणेसाठी ५० हजार कोटींचं पॅकेज देण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. कोळश्याच्या व्यावसायिक उत्पादनावर भर दिला जाणार असंही निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. कोळशाद्वारे गॅसनिर्मितीला प्राधान्य दिलं जाणार असंही त्यांनी स्पष्ट केलं. कोळसा क्षेत्रातील सरकारचे एकाधिकार कमी केले जाणार असंही त्यांनी सांगितलं. कोळसा उत्पादनासाठी खासगी कंपन्यांना संधी दिली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
गुंतवणूक वाढवणं रोजगार वाढवणं हे आपल्या समोरचं आव्हान आहे. देशात उत्पादन आणि देशासाठी उत्पादन करायचं आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केल्यानंतर त्यासंबंधीच्या घोषणा करणारी ही आज केंद्रीय अर्थमंत्र्यांची चौथी पत्रकार परिषद आहे. आज आठ क्षेत्रांसबंधीच्या घोषणा करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मोठे सुधार करण्याकडे मोदी सरकारचा कल आहे असंही सीतारामन यांनी स्पष्ट केलं. गुंतवणूक करण्यासाठी परदेशांची भारताला पसंती मिळाली आहे असंही त्या म्हणाल्या. बँकिंग क्षेत्रातही मोठ्या सुधारणा करणं गरजेचं आहे असंही त्यांनी सांगितलं.