मुंबई (वृत्तसंस्था) – बीकेसी येथे सोमवारपासून रुग्णांना दाखल करण्याचे काम सुरु होणार आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईत रुग्णांना खाटा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी लाखभर खाटांची व्यवस्था करण्यात येत असून वानखेडे स्टेडियम, बीकेसी, वरळी एनएससीआय येथे व्यवस्था पूर्ण झाली असून नजीकच्या काळात गोरेगाव, मुलुंड, दहीसर, वरळी दुग्ध वसाहत येथेही लवकरच अशा प्रकारे कोरोना केअर सेंटर्स उभारली जातील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
वानखेडे स्टेडियमसाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी मुंबई पालिकेने मुंबई क्रिकेट मंडळाला पत्र पाठविले आहे. ५०० खाटांसाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच बीकेसी येथील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना दाखल करण्याचे काम सुरू होईल. याच ठिकाणी एक हजार खाटांचे अतिदक्षता विभाग देखील सुरु केला जात असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले. दरम्यान, मुंबईतील खासगी रुग्णालयातील ६० टक्के खाटा कोरोनाच्या रुग्णांसाठी राखीव ठेवाव्यात यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर केल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.