नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – मोबाइल फोनमुळे करोनाचा फैलाव होऊ शकतो, असा इशारा रायपूर एम्समधील डॉक्टरांच्या एका गटाने दिला आहे. एवढेच नव्हे तर, रूग्णालयांमधील मोबाईलच्या वापरावर निर्बंध घालण्याची सूचनाही डॉक्टरांच्या संबंधित गटाने केली आहे.

बीएमजे ग्लोबल हेल्थ जर्नलमध्ये डॉक्टरांच्या गटाचा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये मोबाइलपासून असलेला करोना फैलावाचा धोका अधोरेखित करण्यात आला आहे. मोबाइल फोनचे पृष्ठभाग उच्चस्तरीय धोक्याच्या स्वरूपाचे आहेत. ते थेटपणे तोंड, नाक आणि डोळ्यांच्या संपर्कात येतात. हात योग्य पद्धतीने धुतले तरी मोबाइलचा वापर सातत्याने होत असतो.
मास्क आणि इतर वस्तूंप्रमाणे ते धुता येऊ शकत नाहीत. तसेच, त्यांची विल्हेवाटही लावली जाऊ शकत नाही. त्यामुळे मोबाइल करोनाचे वाहक ठरू शकतात, असे त्या लेखात नमूद करण्यात आले आहे. भारतातील एका अभ्यासानुसार 100 टक्के डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचारी मोबाइल फोनचा वापर करतात. त्यातील केवळ 10 टक्के जणच मोबाईल नियमितपणे स्वच्छ करतात. तो अभ्यास आणि करोनाचा फैलाव विचारात घेता मोबाइल फोनविषयीचे निष्कर्ष महत्त्वाचे मानले जात आहेत.







