पुणे (वृत्तसंस्था) – दौंड तालुक्यातील उंडवडी येथे जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणात पुतण्याने आपल्या चुलत्याचा कोयत्याने मानेवर वार करीत खून केला व नंतर दोन चुलत भावांनाही जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज (दि. 15) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली.

बापू लक्ष्मण गारुडी (वय 50, रा. उंडवडी, मेमाणेवस्ती, ता. दौंड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर संदीप गारुडी व बंटी उर्फ स्वप्निल गारुडी हे दोघे भाऊ गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर आरोपी अमित उर्फ भाऊ पोपट गारुडी यास यवत पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. आरोपी अमित गारुडी व त्यांचे चुलते बापू गारुडी यांच्यात जमिनीवरून चार वर्षांपासून वाद आहेत. असाच वाद गुरुवारी (दि. 14) झाला होता. ही भांडणे गावकऱ्यांनी बैठक घेऊन मिटवली होती. आज (दि. 15) रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास संदीप गारुडी व त्यांचे वडील बापू गारुडी असे दोघे दुचाकीवरून शेतात गेले होते. त्यानंतर बंटी पाठीमागून 10 वाजता दुचाकीवर शेतीचे साहित्य घेऊन शेतात गेला.
त्यावेळी शेतात आरोपी अमित हा चुलते बापू गारुडी व चुलत भाऊ संदीप यांच्याशी भांडणे करीत होता. अमितने त्याच्या हातातील कोयता संदीप याच्या मानेवर मारल्याने जखमी होऊन रक्त येत होते. जखमी संदीप यास दुचाकीवरून खामगाव, गाडमोडी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात होते. भोसलेवाडीच्या हद्दीतील धनगरबाबा मंदिराच्या अलीकडे ओढ्याजवळ दुचाकी आली असता आरोपी अमित याने त्याच्या मोटारगाडीने पाठीमागून येऊन दुचाकीस जोराची धडक दिली. या धडकेत बापू गारुडी, संदीप गारुडी व बंटी गारुडी असे तिघेजण खाली पडले.
गाडीतून खाली उतरत अमितने त्याच्या हातातील कोयत्याने संदीपच्या मानेवर मारले. चुलते बापू गारुडी यांच्याही मानेवर कोयत्याने वार केला. यात बापू गारुडीयांचा जागीच मृत्यू झाला. तर बंटी याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. बंटी उर्फ स्वप्निल गारुडी याच्या फिर्यादीवरून यवत पोलिसांनी आरोपी अमित उर्फ भाऊ पोपट गारुडी याच्या विरोधात खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे यासह आदी कलमान्वये गुन्हा दाखल करीत आरोपी यास ताब्यात घेत अटक केली आहे.







