पुणे (वृत्तसंस्था) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालय व परीसंस्थांनी ‘परीक्षा मार्गदर्शन समिती’ची स्थापना करावी, असे आदेश विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिले आहेत. याद्वारे विद्यार्थ्यांना येणाऱ्या शंकांचे निरसन करणे शक्य होणार आहे.

राज्याच्या उच्च शिक्षण विभागाकडून प्राप्त आदेशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन व समुपदेशन करण्यासाठी पुणे, अहमदनगर व नाशिक या तीनही जिल्ह्यांत समुपदेशन केंद्र सुरू केले. मात्र, विद्यार्थी संख्येच्या तुलनेत समुपदेशन केंद्रांची संख्या खूपच कमी असल्यामुळे या केंद्रांवरील समुपदेशकांवर कामाचा ताण येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे आता विद्यापीठाशी संलग्न प्रत्येक महाविद्यालयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापकांकडूनही परीक्षेसंदर्भातील माहिती जाणून घेता येणार आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा कोणत्या पद्धतीने होणार, प्रथम वर्षातील बॅकलॉगच्या विषयांची परीक्षा केव्हा होणार, परीक्षा अर्ज भरायचा राहून गेला आहे, त्यासाठी काय करावे लागणार, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना पडले आहेत.







