नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – गुजरातमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. आज दुपारी 12 वाजून 57 मिनिटांनी कच्छ येथे भूकंपाचा धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.5 होती. भूकंपाचे केंद्र कच्छपासून 15 किलोमीटर अंतरावर होते. भूकंपाच्या झटक्यानंतर लोक घराबाहेर पडले होते. यापूर्वी रविवारी कच्छ येथे 5.5 तीव्रतेचा भूकंप झाला.
आज आलेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू भूजच्या भचाऊ जवळ होता. काल रात्री झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू देखील भचाऊजवळच होता. काल रात्रीपासून आतापर्यंत 11 लहान-मोठ्या भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगितले जात आहे. तेथील लोक हे घाबरलेल्या अवस्थेत आहेत. या दरम्यान सध्या तेथे कोणतीही जीवितहानी नाही किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
जम्मू-काश्मीरमध्येही भूकंप
जम्मू-काश्मीरमध्ये देखील या आठवड्यात दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सोमवारी पहाटे 4 वाजून 36 मिनिटांनी भूकंपाचा हादरा जाणवल्याचे सांगितले जात आहे. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.2 होती. यात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
रविवारी रात्री उशिरा गुजरातमध्ये भूकंप
रविवारी रात्री 8 वाजून 13 मिनिटांनी गुजरातमध्ये भूकंप झाला, त्यानंतर भीतीचे वातावरण पसरले होते आणि लोक आपल्या घरातून बाहेर पडले होते. भूकंपाचे केंद्रबिंदू कच्छमधील भचाऊच्या जवळ दहा किमी आत आहे. या भूकंपानंतर कच्छमधील बर्याच घरांमध्ये तडे गेले आहेत.
दिल्लीत देखील अनेकदा पृथ्वी हादरली
यापूर्वी 8 जून रोजी दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर भूकंप 2.1 होता. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या म्हणण्यानुसार, हरियाणाच्या गुरुग्रामपासून 13 किलोमीटर पश्चिम-वायव्येस कमी तीव्रतेचा भूकंप झाला. याची खोली 18 किलोमीटर होती आणि तो दुपारी एक वाजता आला होता.