नवी दिल्ली : भारताच्या एका विषाणूरोगतज्ञाने कोरोनाबाबत भाकीत केले आहे. उष्ण वातावरणामुळे करोना विषाणूचा प्रसार कमी होण्याची शक्यता असली, तरी हा विषाणू उन्हाळ्यात नष्ट होईल असे समजणे चुकीचे आहे, असे मत त्याने व्यक्त केले आहे. याबाबतचे वृत्त लोकसत्ताने प्रसिद्ध केले आहे.

याबबत शिव नाडर विद्यापीठाच्या जीवविज्ञान विभागाचे सहायक प्राध्यापक विषाणूतज्ज्ञ नागा सुरेश वीरापू यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, करोना विषाणूचा प्रसार हा हवामानानुसार कमी-जास्त होत नसतो. हवामान व पर्यावरणातील इतर बदलांमुळे सार्स सीओव्ही २ विषाणू नष्ट होण्याची शक्यता वर्तवणे खूप घाईचे होईल. जास्त तपमानाने विषाणूचा प्रसार कमी होईल हे म्हणणे योग्य वाटत असले तरी उन्हाळ्यामुळे तो विषाणू नष्ट होईल असे गृहीत धरणे चुकीचे आहे.
वीरापू यांनी असे म्हटले आहे की, उष्ण हवामानाने करोनाचा प्रसार कमी होऊ शकतो पण त्यातून हा विषाणू नष्ट होणार नाही. प्रसार कमी होण्याच्या काळाचा भारताने इतर उपाययोजनांचा वापर केला पाहिजे. त्यामुळे देशातील करोनाचा आलेख सपाट होईपर्यंत प्रतिबंधात्मक उपाय सुरू ठेवले पाहिजेत.
याबबत आधी देखील तज्ञांनी मतंं व्यक्त केली होती. अमेरिकेतील मॅसॅच्युसेटस इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या संशोधकांनी असे म्हटले होते की, उष्ण व आर्द्र हवामानामुळे विषाणूच्या प्रसाराचा वेग कमी होतो. त्यामुळे आशियायी देशात मोसमी पाऊस सुरू होणार असल्याने विषाणूचा प्रसार कमी होऊ शकतो. ट्रम्प प्रशासनाने असे जाहीर केले होते की, सूर्यप्रकाश, उष्णता, आर्द्रता यामुळे विषाणूच्या प्रसारास अनुकूल स्थिती राहणार नाही.







