नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – रशियामध्ये ही कोरोनाने थैमान घातला आहे. कोरोना पॉझिटिव्हच्या संख्येत अमेरिकेनंतर रशिया दुसर्या स्थानावर पोहोचला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे प्रवक्ते दमित्री पेस्कोव्ह यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहित समोर आली आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. एक महिन्याआधी आपण राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची भेट घेतली होती असं दमित्री यांनी सांगितलंय.
दमित्री पेस्कोव्ह 2000 च्या सुरुवातीपासून पुतीन यांच्याबरोबर काम करत आहेत. तर 2008 पासून ते पुतीन यांचे प्रवक्ता आहेत. दमित्री पेस्कोव्ह यांच्या पत्नीही कोरोनाबाधित झाल्या असून त्यांच्यावरही हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांनी इन्स्टाग्रामवरून ही माहिती दिली. राष्ट्राध्य़क्ष पुतीन घरातूनच काम करत असून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या अधिकाऱ्यांसोबत संवाद साधत आहेत. रशियात लॉकडाऊन सुरू असून त्यासाठी कठोर नियमांचं पालन करावं लागतंय.