नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ सुरु करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी मोठी घोषणा केली आहे. आता केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अर्थात सीएपीएफच्या कॅन्टीनमध्ये केवळ स्वदेश वस्तूंचीच विक्री होणार आहे. नवा नियम 1 जूनपासून लागू होईल. अमित शाह यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली. तसंच देशात बनवलेल्या वस्तूंचाच अधिकाधिक वापर करण्याचं आवाहन त्यांनी केलं.
गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं की, “सर्व सीएपीएफच्या कॅन्टीनमध्ये आता फक्त देशात बनलेल्या उत्पादनांचीच विक्री करण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने आज घेतला आहे. 1 जून 2020 पासून देशभरातील सर्व सीएपीएफ कॅन्टीनमध्ये हा निर्णय लागू होईल. या निर्णयामुळे जवळपास 10 लाख सीएपीएफ कर्मचाऱ्यांचे 50 लाख नातेवाईक स्वदेशी उत्पादनांचा वापर करतील.”







