यावल ( प्रतिनिधी) – राज्यामध्ये कोरोनामुळे हजारोे लोकांना विळख्यात घेतले असून पन्नास दिवसांपासून नागरिकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने विविध उपाय योजना आखल्या आहेत. आता हा लॉकडाऊन चौथ्या टप्प्यात जात असून छोटे-मोठे उद्योग धंदे बंद असल्याने रोजगार निर्मिती होऊ शकत नाही याचा दुष्परिणाम ग्रामीण भागातील हातावर पोट भरणार्या गरीब कुटुंबात दिसून येत आहे ग्रामीण परिसरात लोक सध्या शासनाकडून मिळणार्या धान्याच्या आजही प्रतीक्षेत दिसत आहे. नुकतेच हिंगोणासह तालुक्यातील इतर गावांमध्ये शिधापत्रिकाधारक कुटंबांना महिन्याला प्रत्येकी पाच किलो तांदूळ मोफत मिळाले आहे. ज्या ग्रामस्थांकडे केशरी रेशन कार्ड आहे परंतु धान्य मिळत नाही अशा ग्रामस्थांना सुद्धा शासनाकडून धान्य मिळत आहे. परंतु ज्या कुटुंबाकडे रेशन कार्डच नाही अशी कुटुंबं आजही
धान्याच्या प्रतीक्षेत आहेत.
तलाठी दीपक गवई, कोतवाल सुमन आंबेकर, पोलीस पाटील दिनेश बाविस्कर व रेशन दुकानदार यांनी हिंगोणा कार्यक्षेत्रातील मोर धरण, काळा डोह, विटवा वस्ती तसेच शेती शिवारात फिरून ज्यांच्याकडे रेशन कार्डच नाही अशा 200 आदिवासी व इतर कुटुंबांची यादी करून या कुटुंबांना धान्य मिळण्यासाठी तहसील कार्यालय येथे यादी पाठवण्यात आली परंतु 1 महिना होउनदेखील या कुटुंबांना धान्य मिळाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या आदिवासी पावरा बारेला कुटुंबांना धान्य
लवकरात लवकर देण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे.
सध्या तातडीची मदत म्हणून अशासकीय प्रयत्न सुरू असून एनजीओ मार्फत धान्य पोहोचवले जाईल व त्यांचे रेशन कार्ड बनवून त्यांना धान्याचा कायमचा लाभ कसा देता येईल याचे प्रयत्न करू असे यावलचे तहसिलदार जितेंद्र कुँवर यांनी सांगितले.
प्रत्येकांला धान्य मिळणार – आदिवासी विकास विभागाकडे जे मजूर काम करीत आहे त्यांना देखील धान्याचा लाभ कसा देता येईल याचे प्रयत्न करू असे रावेर यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले







