नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – ईरानची राजधानी तेहरानपासून 180 किलोमीटर दूर सेमनान रुग्णालयात दाखल असलेल्या आजीने कोरोना व्हायरसवर मात केली आहे. या आजींचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र त्यांची सर्वत्र चर्चा होत आहे.स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार सेमनान प्रांतचे आरोग्य अधिकारी नाविद दानाई यांनी मीडियाला सांगितले की, 103 वर्षांच्या एका महिलेला कोरोना व्हायरस झाला होता. कोरोना व्हायरस झालेल्या या सर्वात वृद्ध महिला होत्या. त्यांनी कोरोनावर मात केली आहे. आता त्या रुग्णालयातून घरी परतल्या आहेत.
या वयस्कर महिलेने एवढ्या लवकरच आजारावर मात केल्याने हा चमत्कार मानला जात आहे. कारण कोरोना व्हायरस हा इम्यून सिस्टम खराब असणाऱ्या आणि वृद्धांसाठी जास्त घातक आहे. त्यांना या व्हायरसमुळे मृत्यूचा धोका अधिक असतो. कारण जगभरातील वयस्कर लोकांना याचा जास्त सामना करावा लागतोय. महत्त्वाचे म्हणजे आजारुन बऱ्या होऊन घरी येणाऱ्या या एकट्या आजी नाहीत. यापूर्वी दक्षिण-पूर्वी ईरानच्या एका 91 वर्षीय व्यक्तीलाही रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. रिपोर्ट्सनुसार या वयस्कर रुग्णांना हाय ब्लड प्रेशर आणि दमाही होता. अशा वेळी हे घातक मानले जाते. या वरिष्ठ रुग्णांना कोणते औषध देऊन बरे करण्यात आले हे सध्या ईरानी डॉक्टरांनी स्पष्ट केलेले नाही.