नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कॉंग्रेसचे नेते ज्योतीरादित्य शिंदे यांनी भारतीय जनता पक्षात पक्षाध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यामुळे मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार कोसळण्याच्या अवस्थेत आले आहे. गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्यानंतर त्यांनी कॉंग्रेसशी असणारा 18 वर्षांचा घरोबा संपवला.
भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. कॉंग्रेसमध्ये माझी स्वप्नपुर्ती होणे शक्य नव्हते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या कुटुंबात स्थान दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि जे. पी नड्डा यांनी त्यांच्या कुटुंबात स्थान दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. माझ्या आयुष्यात दोन महत्वाचे दिवस आहेत. 30 सप्टेंबर 2001 या दिवशी माझे वडील मरण पावले. त्या दिवशी माझे आयुष्य बदलले. दुसरा दिवस 10 मार्च 2020 या दिवशी वडिलांची 75 जयंती. त्या दिवशी मी नवा निर्णय घेतला. जन सेवेवर माझा विश्वास आहे. त्यासाठीच राजकारण हे साधन आहे, असे मी मानतो.कॉंग्रेसमध्ये असताना माझ्या वडिलांनी देशाची आणि राज्याची सेवा केली. मात्र आज अशी स्थिती आली आहे की देशासाठी काम करण्याचे माझे लक्ष्य पूर्ण होऊ शकणार नाही. पुर्वी होती तशी कॉंग्रेस आता राहिली नाही.कॉंग्रेस वस्तुस्थितीकडे डोळेझाक करत आहे. पक्षाला जडत्व आले आहे. अनेकांना नेतृत्वाची संधी मिळत नाही. संपूर्ण देशात हेच चित्र आहे. पण मध्यप्रदेशात आम्ही पाहिलेल्या स्वप्नांच्या चिंधड्या उडाल्या आहेत.