मुंबई (वृत्तसंस्था) – महाविकास आघाडीत नाराजीचे सुर उमटू लागले आहेत. काँग्रेस नेत्यांची काल बैठक पार पडली. त्यामध्ये निर्णय प्रक्रियेत सहभागी करत नसल्यामुळे काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे म्हटले होते.
दरम्यान, आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांनी याविषयावर भाष्य केले आहे. टोपे म्हणाले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना विश्वासात घेऊनच महाविकास आघाडी सरकारचं काम सुरु आहे.
टोपे म्हणाले, आघाडी सरकारची एक छोटी कोअर कमिटी आहे. या कमिटीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे प्रत्येकी दोन ज्येष्ठ नेते आहेत. या सर्व नेत्यांच्या कोअर कमिटीची बैठक होते. ही कोअर कमिटी एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर निर्णय घेते.