नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोरोईंनी गुरुवारी राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. रंजन गोगोई सदनामध्ये शपथ घेत होते. तेव्हा काँग्रेसच्या नेतृत्त्वाच विरोधी पक्षाच्या काही खासदारांनी गोंधळ घातला. गोगोई शपथ घेत असताना शेम-शेमच्या घोषणा देण्यात आल्या आणि खासदार सदनातून बाहेर पडले.
यानंतर कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी विरोधीपक्षावर पटलवार केला. ते म्हणाले की, यापूर्वीही अनेक सरन्यायाधीश आणि प्रसिद्ध व्यक्ती या सदनाचा भाग राहिले आहेत. त्यांनी त्यांचे योगदानही दिले आहे. यावेळी असेच होईल अशी अपेक्षा आहे. तर सभापती म्हणाले की, सदनाबाहेरील कोणाच्याही सल्ल्याचा आम्ही विचार करत नाही. मात्र राष्ट्रपतींनी दिलेल्या नामांकनाला नितळ भावनेने स्वीकारावे. काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा म्हणाले की, आम्हाला अडचणी आहेत. ते एक वादग्रस्त सरन्यायाधीश होते. त्यांच्या नियुक्तीने Quid Pro Quo चा मुद्दा उचलून धरला. हे न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याला कमकुवत करते. यामुळे आम्ही सदनाबाहेर गेलो. आनंद शर्मा पुढे म्हणाले की, रंजन गोगोई नुकतेच रिटायर झाले आहेत. त्यांनी अनेक वादग्रस्त निर्णय दिलेले आहेत. रंजन गोगोईंवर निशाणा साधताना आनंद शर्मा म्हणाले की, माजी सरन्यायाधीशांनी अनेक प्रकरणांची सुनावणी उशीराने केली. याचेच त्यांना बक्षिस मिळाले आहे.







