पुणे (वृत्तसंस्था) – कुंजीरवाडी (ता. हवेली) हद्दीतील थेऊरफाटा जवळ असलेल्या एका वस्तीवरील 35 वर्षाच्या तरुणाचा अपघात झाल्याने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याची करोना चाचणी घेतली असता तो करोना पॉझिटिव्ह आला. करोनाची लागण झालेला हा तरुण कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील पहिला रुग्ण ठरला आहे.
युवकाचा शुक्रवारी (दि. 8) हडपसर-सासवड राज्यमार्गावर वडकी (ता. हवेली) हद्दींत दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला होता. त्याला उपचारासाठी वडकी येथील युवकांनी हडपसर गाडीतळ येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते; परंतु तेथील उपचार समाधानकारक न वाटल्याने नातेवाइकांनी त्याला शनिवारी (दि. 9) दुपारी शेवाळेवाडी येथील एका खासगी रूग्णालयात दाखल केले होते. तेथे तो करोना बाधित असल्याचे रविवारी (दि. 10) निष्पन्न झाले.
तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळताच थेऊरफाट्यापासून तीन किलो मिटरचा भाग प्रंतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेले आई-वडील, पत्नी, मुलगा, बहिण व भाची या सहा जणांना तपासणीसाठी रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. हा तरुण लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून घरीच होता. त्यामुळे त्याला करोनाची लागण नेमकी कुठे झाली? हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याला रूग्णालयात नेणारे वडकी येथील तरुण, गाडीतळ व शेवाळेवाडी येथील खासगी रुग्णालयात दाखल करणाऱ्यांची माहिती घेण्यात येत आहे.
कुंजीरवाडी हद्दीत सापडलेल्या रुग्णाने शेवाळवाडी व हडपसर गाडीतळ येथील रुग्णालयात औषधोपचार घेतले होते.त्यामुळे या दोन्ही रुग्णांलयातील संबंधित डॉक्टर, नर्स, सेविका यांची कोव्हिड 19 ची तपासणी करावयाची आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर क्वारंटाइन करणेबाबत आदेश देण्यात येतील. संबंधित करोना बाधित रुग्णास तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले आहे. अधिकारी यांनी दिली.
-मेहबूब लकडे, आरोग्य अधिकारी