नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – हवेली तालुक्यात बांधकामांची संख्या जवळपास पंचवीस हजारांच्या पुढे गेली आहे. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक असणारा हा एकमेव व्यवसाय अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारा असतानाच करोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे सध्या या व्यवसायाला घरघर लागली आहे. या व्यवसायाशी निगडित इतर व्यवसायांमध्ये गुंतवणूक करणारे लोक, बांधकाम व्यवसायाशी निगडित असणारे व्यवसाय तसेच कामगार कारखानदार मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. या व्यवसायावर आधारित सुमारे एक लाख कामगार आणि पूरक व्यवसायांना झळ बसली आहे.
गेल्या पंधरा वर्षांत पूर्व हवेलीचा भाग मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. पुणे शहरालगतचा हा परिसर विकसित झाला आहे. येथील परिसरात लाखो सदनिका तयार झाल्या आहेत. आजही या भागातील गृहप्रकल्पांचा विस्तार सुरू आहे. लाखोंची संख्या या परिसरात आहे. तसेच पूरक घटकांना रोजगारांच्या संधी मिळाल्या आहेत. सुमारे एक लाख लोकांच्य हाताला काम मिळाले आहे.
मात्र, गेल्या चार ते पाच वर्षांत बांधकाम क्षेत्राला मरगळ आली आहे. संथगतीने सुरू असलेले हे क्षेत्र लॉकडाऊनच्या चक्रव्यूहात पुरते अडकले आहे. काळात कामे रखडली आहेत. अनेकांनी घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नामांकित गृहप्रकल्पामध्ये बॅंकांची कर्ज घेऊन गुंतवणूक करून आपल्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यानुसार अनेकांनी बॅंकांचे हप्ते देखील भरले आहेत.
मात्र, सध्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे ही बांधकामे कधी पूर्णत्वास येणार आणि नागरिक कधी या घरांमध्ये राहण्यास येणार, हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. बॅंकांची हप्ते नागरिकांना चुकणार नाहीत. मात्र घरांमध्ये राहण्यास आणि घर पूर्ण होण्यास मात्र दिरंगाई होणार आहे.
सदनिका तसेच गृहप्रकल्प यांच्या नोंदी करण्यासाठी मुद्रांक शुल्क तथा नोंदणी शुल्कापोटी शासनाला मिळणारा कोटी रुपयांचा महसूल सध्या या व्यवसायाला आलेल्या संकटामुळे बुडणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहे. शासनाकडून विकासकामांना मिळणारा निधी देखील कमी होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे विकासकामांवर परिणाम करणारा हा एकमेव व्यवसाय मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे
हवेली तालुक्यात लोणी काळभोर, वाघोली, उरळी कांचन, थेऊर, केसनंद, लोणीकंद आदी परिसरात गृहप्रकल्पांची संख्या जास्त आहे. ग्रह प्रकल्पांमध्ये काम करणाऱ्या मजुरांची संख्या देखील याच प्रमाणात आहे. लॉकडाऊनमुळे अनेक कामगार या भागातून पायी चालत आपापल्या भागाकडे निघून गेले आहेत. काही मजूर मिळेल त्या साधनाने आपल्या गावी पोहोचले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा हे व्यवसाय उभे राहण्यास मजुरांची गरज भासणार आहे. पण मजूरच नसल्याने हा व्यवसाय पुन्हा कसा उभारी घेणार, हा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे. मजूर नसलेला आणि इमारती असलेला भाग म्हणून हा भाग काही दिवसांनी प्रचलित होऊ शकतो, अशी काहीशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.
बांधकाम क्षेत्राला लागणाऱ्या कच्चा मालाचा पुरवठा करणारी यंत्रणा ही तालुक्यातील याच भागात आहे. सध्या कच्चामालाचे पुरवठा करणारे तसेच इतर बांधकामाशी निगडीत साहित्य पुरवणाऱ्या अनेक लघुउद्योग तसेच मोठे उद्योग तसेच त्याच्याशी निगडित असणाऱ्या साहित्य साधने व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या लोकांवर सध्या उपासमारीची वेळ आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हाताला काम नसल्याने तसेच आपल्या कामाच्या कोणतेही रकमा संबंधित बांधकाम व्यावसायिकाला देता येत नसल्याचे चित्र असल्याने अशा नागरिकांना कामापासून व उत्पन्नापासून वंचित राहण्याशिवाय पर्याय उरला नाही.