नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – पालघरमधील सामूहिक हत्याकांडप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडे उत्तर मागितले आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय)मार्फत किंवा विशेष तपास पथक (एसआयटी)मार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावर आज सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली.

सर्वोच्च न्यायालायने राज्य सरकारला उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी दिला आहे. पुढील सुनावणी २ जुलै रोजी होणार आहे. तसेच राज्य सरकार, डीजीपी आणि सीबीआयला नोटीस जारी केली आहे. पालघर घटनेच्या सध्या सुरू असलेल्या तपासाबाबत सर्वोच्च न्यायालयाने १ मे रोजी महाराष्ट्र सरकारकडे चौकशी अहवाल मागविला होता. दरम्यान, न्यायालयाने या प्रकरणी सुरू असलेल्या तपासाला स्थगिती देण्यास नकार दिला.
दरम्यान, पालघरमध्ये दोन साधूंसह तीन जणांची जमावाने बेदम मारहाण करून हत्या केली होती. याप्रकरणी ११५ जणांना अटक केली आहे.







