सिडनी (वृत्तसंस्था) – कोरोनामुळे चीनचे जगातील बहुतेक सर्वच राष्ट्रांसोबत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यातच गेल्या काही दिवसांपासून चीन आणि ऑस्ट्रेलियामधील वातावरण बिघडले आहे. तसेच चीनने ऑस्ट्रेलियातून चीनमध्ये होणाऱ्या निर्यातीवर अनेक निर्बंध लादून त्यांची कोंडी करण्याचे प्रयत्न केले आहे. दरम्यान, चीनच्या कोणत्याही धमक्यांना घाबरणार नसल्याचे वक्तव्य ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी केले.
ऑस्ट्रेलियातून चीनमध्ये होत असलेल्या निर्यातीवर निर्बंध लावण्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना त्यांनी हे उत्तर दिले.दरम्यान, मंगळवारी चीनच्या शिक्षण मंत्रालयानेदेखील ऑस्ट्रेलियात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा विचार करण्याचा सल्ला दिला होता. बाहेरून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांकडूही ऑस्ट्रेलियाला मोठा फायदा होता. बाहेरून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ऑस्ट्रेलियाला वर्षाला २६ अब्ज डॉलर्सचा महसूल मिळतो.
चीनच्या या धमकीमुळे ऑस्ट्रेलियातील शिक्षण क्षेत्राकडून होणाऱ्या कमाईवरही परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलिया खुल्या बाजाराचे समर्थन करतो. परंतु धमकी कोणत्याही ठिकाणाहून येवो आम्ही आमच्या मूल्यांशी कधीही तडजोड करणार नाही,अशी प्रतिक्रिया मॉरिसन यांनी एका रेडिओ वाहिनीशी बोलताना दिली.
ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षणाच्या आणि पर्यटनाच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत चीनच्या विद्यार्थ्यांनी यासाठी ऑस्ट्रेलियाची निवड करायची अथवा नाही हा त्यांचा निर्णय आहे. मला माझ्या देशातील शिक्षण क्षेत्रावर आणि पर्यटन क्षेत्रावर पूर्णत: भरवसा आहे, असेही ते म्हणाले. विद्यार्थ्यी आणि पर्यटकांसाठी आपला देश सुरक्षित असल्याचेही ते म्हणाले.
करोनाच्या संपूर्ण जगभरात झालेल्या प्रसाराचा आंतरराष्ट्रीय तपास करण्याची मागणी अमेरिका आणि युरोपीयन देशांनी केली होती. ऑस्ट्रेलियानेही याला समर्थन देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर चीननं ऑस्ट्रेलियावर गरळ ओकत त्यांची आर्थिक कोंडी करण्याचे प्रयत्न केले होते.







