औरंगाबाद (वृत्तसंस्था) – शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सलग चार दिवस आढळून आल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळपर्यंत एकही अहवाल पॉझिटिव्ह आलेला नव्हता. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला नाही मात्र शुक्रवारी रात्री उशिरा दोन संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले. त्यामुळे आता आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन व महापालिकेची झोप उडाली आहे. शहरात सलग पाचव्या दिवशी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २० वर गेली आहे. यातील एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक महिला रुग्ण ठणठणीत बरी झाली आहे.
शहरात पुन्हा दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यादव नगर येथील 29 वर्षीय युवक व सातारा परिसरातील 40 वर्षीय महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पॉझिटिव्ह रुग्णाचा आकडा 20 वर पोहोचल्याने औरंगाबादकरांसाठी हि एक धक्कादायक बाब आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातच बसून आणखी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभाग तसेच प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्हा सामान्य रूग्णालयात (मिनी घाटी) आज 75 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 13 जणांना कोरोनासारखी लक्षणे आढळल्याने घरातच अलगिकरणात राहण्याचा सल्ला त्यांना दिल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच नवीन 57 जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले. एकूण 57 जणांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी घाटी येथे पाठविलेले आहेत. काल आणि आजचे मिळून 48जणांचे तपासणी अहवाल नकारात्मक आले आहेत. तेथील 72 तपासणी अहवाल येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या एकूण 15 कोरोनाबाधित रुग्णांवर मिनी घाटीत उपचार सुरू आहेत. तर देखरेखीखाली ठेवण्यात आलेल्या रुग्णांपैकी 42रुग्णांना त्यांच्यावर पूर्ण उपचारानंतर सुटी देण्यात आल्याचेही डॉ. कुलकर्णी म्हणाले.