नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. चार तास चाललेल्या या चर्चेमध्ये दिल्ली व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून देशभरातील लॉक डाऊनचा कालावधी वाढवण्याची आग्रही मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. या चर्चेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये लॉक डाऊनचा कालावधी वाढवण्याबाबत एकमत झाल्याची देखील माहिती असून पंतप्रधान देशातील लॉक डाऊनचा अवधी दोन आठवडयांनी वाढवण्यासाठी अनुकूल आहेत.या चर्चेनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशातील लॉक डाऊनची मुदत वाढविण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला असल्याचं ट्विटद्वारे सांगितलं आहे. आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबतची माहिती दिली असून लॉक डाऊन वाढविण्याचा निर्णय घेतल्याबाबत पंतप्रधानांचे आभार देखील मानले आहेत.आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘पंतप्रधानांनी लॉक डाऊनचा कालावधी वाढवण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. आज भारताची स्थिती इतर सुधारित देशांपेक्षा चांगली असण्यामागे आपण लवकर घेतलेला लॉक डाऊनचा निर्णय आहे. जर आता लॉक डाऊन उठवला तर आपण जे काही मिळवलं आहे ते गमावून बसू.’