मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यामध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या रुग्णांची प्रकृती स्थीर असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. आरोग्य विभागासह विमानतळ, बंदरे, रेल्वे येथेही आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. नागरिकांनी सामुहीक कार्यक्रमांना गर्दी करणे टाळावे. शाळा, महाविद्यालये तसेच धार्मिक कार्यक्रम यांचेबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात घेतानाच खासगी रुग्णालयातील विशेषज्ञांनी यासंदर्भात सर्वसामान्यरित्या अवलंबवायची कार्यपद्धती (एसओपी) तातडीने तयार करावी. जनजागृती करण्यासाठी सर्व गावांमध्ये ग्रामसभा घेण्यात याव्यात, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यंत्री अजित पवार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे विभागीयआयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून पुणे येथील परिस्थितीबीबत माहिती घेतली. पुणे येथील नायडू रुग्णालयात विलगीकरणाची सुविधा असून गरज पडल्यास पिंपरी चिंचवड येथील नवीन रुग्णालयात देखील विलगीकरणाची सुविधा करावी. व्होंटीलेटर्सची उपलब्धता ठेवावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. उपचारासाठी आवश्यक असणारी कठलीही बाब, उपकरणाची आवश्यकता भासल्यास त्याची खरेदी जिल्हा नियोजन खर्चातून खरेदी करावी, माध्यमांना दररोज माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घ्या, असे निर्देश अजित पवार यांनी यावेळी दिले. उद्धव ठाकरे म्हणाले की, भारत सरकारने नोव्हेल कोरोना व्हायरस (कोविड-19) प्रतिबंधाबाबत करावयाच्या उपाययोजना (Containment Plan) केंद्र सरकारने प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त यांना देण्यात येत आहे. त्यांनी जिल्हाधिकारी,आरोग्य विभाग व इतर आवश्यक विभागांशी समन्वय साधून ही कार्यवाही करावी. कोविड-19 या आजाराबाबत जनजागृती व आरोग्य शिक्षण देण्यासाठी तसेच हात स्वच्छ धुणे, खोकताना- शिंकताना घ्यावयाची काळजी, खोकणाऱ्या, शिंकणाऱ्या व्यक्तीपासून तीन फूट अंतर ठेवणे अशा महत्त्वाचे संदेश देण्यासाठी जनजागृती करण्यासाठी बस स्टँड, एसटी पॅनल, होर्डींग्ज्, दूरदर्शन, रेडिओ अशा विविध माध्यमांचा प्रभावीपणे वापर करावा.
कोरोना चाचणी सकारात्मक आलेल्या व्यक्तिंच्या संपर्कातील जास्त जोखमीच्या (High Risk) व्यक्तिंची चाचणी करावी तसेच कमी जोखमीच्या (Low Risk) व्यक्तिंनी १४ दिवस घरीच थांबण्यास सांगावे. अशा व्यक्तिंच्या घराभोवतालच्या ३ किमी अंतरातील सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
गाव पातळीवर कोरोना विषाणु आजाराच्या संदर्भाने मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी सर्व गावांमध्ये ग्रामसभा घ्याव्यात. त्यामाध्यमातून या आजाराच्या प्रतिबंधासाठी करावयाची कार्यवाहीबाबत माहिती द्यावी.प्रयोगशाळा तपासणी (Throat swab) करण्यासाठी खाजगी प्रयोगशाळांना मान्यता देण्यासाठी केंद्र शासनास विनंती करण्यात येईल व त्यासाठीचा पाठपुरावा राज्य शासनामार्फत करण्यात येईल.
रुग्णांचे स्क्रीनिंग, संशयीत रुग्णाचे प्रयोगशाळा चाचण्या आणि आरोग्य शिक्षण या बाबींसाठी स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोटोकॉल खाजगी रुग्णालयातील विशेषज्ञांनी तयार करून सार्वजनिक आरोग्य विभागास सादर करावेत, असे निर्देशहा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. सर्व टूर ऑपरेटरनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती द्यावी आणि त्यापैकी एखाद्या प्रवाशास ताप, खोकला असल्यास त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, अशा सूचना पर्यटन विभागाला दिल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी विधानभवनात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,राज्यमंत्री राजेंद्र पाटील, माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, रेल्वे, बंदरे, विमानतळ प्राधिकरण, खासगी रुग्णालयातील विशेषज्ञ, विविध विभागांचे अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.