मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आज आणखी तीन जणांची वाढ झाली आहे. राज्यात सध्या 52 कोरोनाबाधित असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. त्यानंतर आज राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागाची बैठक घेत शालेय परीक्षाबाबत महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
यामध्ये दहावीचे उर्वरित पेपर वेळापत्रकानुसार होणार असून नववी, अकरावीचे उर्वरित पेपर 15 एप्रिलनंतर होणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. तर इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून राज्यातील सर्व महानगरपालिका , नगरपालिका व नगर पंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खाजगी शाळा ,कनिष्ठ महाविद्यालये यांना ३१ मार्च २०२० पर्यंत सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याआधीच गेल्या आठवड्यात राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्याप्रमाणे शाळा, महाविद्यालये बंद होती, पण शालेय परीक्षाबाबत निर्णय जाहीर झालेला नव्हता. त्यासंदर्भात आज शिक्षण विभाग आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बैठक घेत अखेर निर्णय घेतला आहे.