जळगाव (प्रतिनिधी) – शहारातील कानळदा रोड परिसरातील खुशी बिअर शॉपीची अज्ञात गुंडांनी तोडफोड केली होती. या भागात सदैव दहशत असलेल्या गुंडांनीच त्या बिअर शॉपी दुकानाच्या मालकाला अप्रत्यक्षपणे धमकावण्यासाठी अशी तोडफोड केली असावी असा त्या भागातील लोकांचा संशय असताना शहर पोलिसांच्या अजब भूमिकेनुसार या संशयित आरोपींविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला. त्यामुळे पोलिसांची भूमिका त्या आरोपींना पाठीशी घालण्याची आहे ? की, कुणाच्या राजकीय आशीर्वादामुळे पोलिसांना मजबुरीतून हा अदखलपात्र गुन्हा नोंदवावा लागला आहे? , अशी चर्चा सुरू झाली आहे.
कानळदा रोड परिसरातील राधारमण अपार्टमेंट इमारतीजवळ परवानाधारक मंजुळाबाई गोपाळ साळी यांचे खुशी बिअर शॉपी नावाचे दुकान आहे. नोकरनाम्यानुसार त्यांचा मुलगा योगेश साळी ते दुकान चालवतो. काल ( दि 9) सायंकाळी 7 वाजता ज्या गुंडांनी दुकानासमोर बिअरच्या रिकाम्या बाटल्या फोडल्या व दुकानमालकाला शिवीगाळ करून अप्रत्यक्ष धमाकावण्याचा प्रयत्न केला ते सीसीटीव्ही कॅमेर्यात चित्रीत झालेले आहेत. या फुटेजसह योगेश साळी यांनी शहर पोलिस ंठाण्यात फिर्याद दाखल केली मात्र पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने हे पोलिसांच्या द़ृष्टीनेही अज्ञात असलेले हे गुंड अद्याप मोकाटच आहेत, अशी चर्चा लोक करीत आहेत. स्थानिक लोकांच्या म्हणण्याप्रमाणे रात्री उशिरापर्यंत या रस्त्यावर थांबून लुटमार करणारी ही टोळी लोकांना त्रास देत खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी देते त्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रार द्यायला कुणीच पुढे येत नाही, हा मुद्दा लक्षात घेऊन यावेळी तरी पोलिसांनी त्यांना वठणीवर आणावे. अशा अदखलपात्र गुन्ह्यातून या गुंडांचे धाडस वाढू नये म्हणून त्यांचे पोलिस खात्यातील कुणी पाठीराखे असतील तर त्यांनाही वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी त्यांनाही शोधावे अशा तीव्र प्रतिक्रीया या भागात व्यक्त होत आहेत.