अकोले (वृत्तसंस्था) – अकोले तालुक्यातील लहीत बु. येथे निसर्ग चक्रीवादळामुळे घराची भिंत अंगावर पडून सागर पांडुरंग चौधरी या युवकाचा मृत्यू झाला होता. त्याच्या कुटुंबीयांची नुकतीच माजी आमदार वैभवराव पिचड यांनी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी मृत तरुणाचे वडील पांडुरंग चौधरी यांनी पैसे भेटतील पण गेलेला मुलगा पुन्हा भेटेल का, असे म्हणत टाहो फोडला.

मृत चौधरी हा माथाडी कामगार असल्याने यावेळी माथाडी कामगार नेते, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याशी बोलून मदत मिळवून देण्याबाबत आपण प्रयत्न करू, असे पिचड यांनी सांगितले. यावेळी जि. प. गटनेते जालिंदर वाकचौरे, भाजप तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, माजी पं. स. सदस्य अरुण शेळके, शंभू नेहे, सरपंच लहानूभाऊ चौधरी, अर्जुन गावडे, राजाभाऊ गोडसे, भाऊ पवार, किरण झोळेकर, राहुल गोडसे, विक्रम आरोटे, पोपट गजे आदी उपस्थित होते.
यावेळी सागरचे वडील पांडुरंग चौधरी यांनी पैसे भेटतील भाऊ! पण माझा मुलगा परत भेटल का? असा भावनिक सवाल केला. त्यावेळी सर्वांची मने हेलावली. सागरची दीड वर्षाची निरागस मुलगी सर्वांना टाटा करीत होती. तिला आपले वडील या जगात नाही, याची जाणीवच नव्हती. सागर हा मोठा मुलगा या अपघातात गेला. लहान मुलगा तीन वर्षांपूर्वी अपघातातून वाचला. पण कायमचे अपंगत्व आले आहे. त्यामुळे या कुटुंबासमोर चरितार्थाचा प्रश्न निर्माण झाला आहे. माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी सागरच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून, संपूर्ण मदत करण्याचे आश्वासन पिचड यांना दिले.







