पुणे (वृत्तसंस्था) – सातारा नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्यासह चौघांवर लाचखोरीचा गुन्हा दाखल झाल्याने पालिकेतील भ्रष्टाचार बाहेर आला आहे. सध्याच्या परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराची साखळी ओपन करुन पालिकेवर प्रशासक नेमावा, अशी मागणी सातारा शहर सुधार समितीने केली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, सातारा पालिकेतील कारभार भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक करण्यासाठी शहर सुधार समितीने नेहमीच आग्रही भूमिका घेतली आहे. आरोग्य विभागाच्या लाचखोरीप्रकरणी झालेल्या कारवाईतून भ्रष्टाचाराची साखळी किती वरपर्यंत आहे, याचा शोध घेण्याची गरज आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने सातारा पालिकेच्या कारभाराची चौकशी करुन अहवाल प्रसिध्द करण्याची मागणी समितीने केली आहे. पालिकेचे बजेट 25 कोटींवरुन आता 350 कोटी झाले.
केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर होणाऱ्या कोट्यवधींच्या प्रकल्पांची अवस्था काय आहे, याचा कधीच शोध लागत नाही. करोनाच्या आव्हानात्मक प्रसंगात सातारा पालिकेचे स्वत:चे रुग्णालय नाही, रुग्णवाहिका नाही, डॉक्टरांसहित वैद्यकीय संच नाही. पालिकेची स्वत:ची शववाहिनी नाही ही शोकांतिका आहे. त्यामुळे सातारा नगरपालिकेवर प्रशासक नेमून सरकारने भ्रष्टाचारी कारभार संपुष्टात आणावा, अशी मागणी समितीचे अस्लम तडसरकर व विक्रांत पवार यांनी केली आहे.