नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशभरात करोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या २४ तासात ९,९८५ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. अशातच एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. देशात प्रथमच करोनामुक्त झालेल्यांची संख्या अॅक्टिव्ह करोना रुग्णांच्या पुढे गेली आहे.

देशभरात आतापर्यंत २ लाख ७६ हजार करोनाबाधित आढळले आहेत. तर महाराष्ट्राने मंगळवारी ९० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. परंतु, आतापर्यंत देशात एकूण १ लाख ३५ हजार २०६ रुग्ण करोना व्हायरसमधून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर १ लाख ३३ हजार रुग्णांवर अद्याप उपचार सुरु आहेत. हेच प्रमाण महाराष्ट्रात 48.47 टक्के इतके आहे. देशातील सक्रिय बाधित आणि करोनामुक्त झालेले बाधित यांची संख्या एकमेकांजवळ येऊन ठेपली आहे.
दरम्यान, करोना संकटाच्या काळात बाधित बरे होण्याचे प्रमाण देशासाठी दिलासादायक ठरत आहे. तर इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अहवालानुसार, देशात कन्टेन्मेंट झोनमधील 15 ते 30 टक्के लोकांना करोनाचा संसर्ग झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. एवढेच नाही तर या व्यक्ती आपोआप कोणत्याही उपचारांशिवाय ठीक झाल्याचेही समोर आले आहे.







