मुंबई (वृत्तसंस्था) – महाराष्ट्रात करोनाच्या संसर्गात झपाट्याने वाढ होत असतानाच पुणे जिल्ह्यातील वाढती करोनाबाधितांची संख्या चिंताजनक आहे. या करोनाविरुद्ध जुन्नर तालुक्यातील प्रशासन अतिशय जोरदार मोहीम राबवित असून श्री विघ्नहराच्या कृपेने जुन्नर तालुक्यात परिस्थिती नियंत्रणात असल्याचे विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बी. व्ही. मांडे यांनी सांगितले. हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडचा सीएसआर फंड व देवस्थान ट्रस्टच्या वतीने सुमारे साडेपाच लाख रुपयांच्या सेफ्टी किट्सच्या वाटपप्रसंगी ते जुन्नर येथे बोलत होते.
या सेफ्टी किट्समध्ये इन्फ्रारेड थर्मोमिटर, पीपीई किट, एन ९५ मास्क, हॅन्ड सॅनेटायझर, डिस्पोजेबल मास्क आदी वस्तूंचा समावेश असल्याचे देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व अश्वमेघ युवा मंचाचे अध्यक्ष गणेश कवडे यांनी सांगितले. हे साहित्य अंगणवाडीसेविका, आशासेविका, तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, महसूल विभाग, पोलीस स्टेशन यांना देण्यात आल्याची माहिती कवडे यांनी दिली. डी. एम. कुलकर्णी, मनीष आगरवाल व लोकेश सिंघल या हिंदुस्थान पेट्रोलियमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी केलेली चर्चा व सततचा पाठपुरावा यामुळे तालुक्याला ही महत्वाची व मोठी मदत मिळाल्याचे गणेश कवडे यांनी सांगितले. आपल्या तालुक्यातील संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी आणखी काही दिवस घरातच राहिल्यास निश्चितपणे ह्या संकटावर आपण मात करू शकतो, असे आवाहन तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी याप्रसंगी केले. याप्रसंगी गटविकास अधिकारी विकास दांगट, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे, नायब तहसीलदार सचिन मुंढे, पोलीस निरीक्षक युवराज मोहिते, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद साबळे, आरोग्य सहाय्यक पृथ्वीराज गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.