पुणे (प्रतिनिधी) – फळ, भाजीपाला विभागानंतर मार्केट यार्डातील भुसार विभाग आता सोमवारपासून (दि. १३) बंद राहणार आहे. त्यामुळे शहरात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होण्याची अथवा अन्नधान्याच्या किंमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याने भुसार बाजारातील व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या दि पूना मर्चंटस चेंबरने बंद बाबत निर्णय घेतला असल्याची माहिती अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली. शुक्रवारपासून फळे-भाजीपाला, कांदा, बटाटा आणि केळी विभाग बंद झाला आहे. तरीही भुसार विभाग सुरू राहणार असल्याचे दि पूना मर्चंटस चेंबर काल गुरुवारी सांगितले होते. मात्र, पोलीस कामगारांना कामावर येताना त्यांची अडवणूक करत आहेत. तसेच ट्रकमधून अन्नधान्य घेऊन येणाऱ्या चालकांना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर त्रास देत आहेत. आम्ही नागरिकांच्या भल्यासाठी करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत बाजार चालवता आहोत . मात्र, पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याने या बंदबाबत निर्णय घेण्यात आल्याचे ओस्तवाल यांनी सांगितले. दरम्यान भुसार बाजार बंदबाबत पत्र मिळाले असल्याचे बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी सांगितले.