मुंबई (वृत्तसंस्था) – शहरातील पवना, इंद्रायणी, मुळा नद्यांच्या पाण्याच्या प्रदूषणाची स्थिती करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या संचारबंदीच्या काळात सुधारली आहे का, याबाबत तपासणी अहवाल उपक्रम इन्व्हर्नमेंट कॉन्झर्वेशन असोसिएशन (ईसीए) आणि टाटा मोटर्स यांनी संयुक्तपणे हाती घेतला आहे. देशभरात सध्या 21 दिवसांचा लॉकडाऊन आहे. या 21 दिवसांच्या काळात शहरातील नद्यांच्या प्रदूषणाची स्थिती सुधारली आहे का, याचा अभ्यास केला जात आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासमवेत झालेल्या चर्चेनुसार आणि त्यांच्या परवानगीने इसीए व टाटा मोटर्स एकत्रितपणे पिंपरी-चिंचवड महापालिका पर्यावरण विभागाच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवत आहे, अशी माहिती ईसीएसचे चेअरमन विकास पाटील यांनी दिली.महापालिका पर्यावरण विभागाकडून संचारबंदीच्या कालावधीत अधिकृत 5 परवाने घेऊन ही कार्यवाही करण्यात आली. ईसीएकडून दोघे आणि टाटा मोटर्सकडून दोघांनी 10 ठिकाणी जाऊन इंद्रायणी, पवना आणि मुळा नदीच्या पात्रातील पाण्याचे नमुने घेतले आहेत. ते सर्व नमुने टाटा मोटर्स कंपनीच्या पाणी तपासणी विभागाकडे सुपूर्द केले आहेत. टाटा मोटर्सकडून दिवसभर प्रवासासाठी एक वाहन व चालक उपलब्ध केला गेला होता. लागणारे आवश्यक साहित्य व दुपारच्या जेवणाची सोय सुद्धा केली होती. दुसरा नमुना गुरुवारी (दि. 9) घेतला. आता तिसरा नमुना 14 तारखेला संबंधितांकडून पूर्वीच्या ठिकाणांवर जाऊन घेतला जाणार आहे. सर्व नमुने तपासणीनंतर येणाऱ्या अहवालाचा अभ्यास केला जाणार आहे. शहरातील उद्योगधंदे 21 दिवस बंद राहिल्याने मोठ्या प्रमाणात नदी प्रदूषणात घट झाली आहे की नाही ? याचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. कोणत्या नदीत, कोणत्या परिसरात नागरी वस्तीमधील सांडपाण्याने जास्त प्रदूषण होत आहे ?, हा अहवाल फक्त महापालिका नदी संवर्धन कामासाठी संदर्भ म्हणून वापरला जाणार आहे. गेल्या 21 दिवसांत नदी प्रदूषणाबाबत काय काय बदल झाले, त्याचा अभ्यास यामध्ये होणार आहे. शहरातील नद्या ‘एमआयडीसी’कडून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे प्रदूषित झाल्या आहेत का ? त्याचाही अभ्यास केला जाणार आहे. देशभरातील ‘लॉकडाऊन’च्या काळात शहरातील तिन्ही नद्यांच्या प्रदूषणाची स्थिती सुधारली आहे का, याची तपासणी करण्यासाठी पाण्याचे नमुने घेतले जात आहे. त्याबाबतचा अहवाल 25 तारखेपर्यंत अपेक्षित आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर महापालिका पर्यावरण विभागाकडे सादर केला जाईल.- विकास पाटील, चेअरमन, इसीए.