मुंबई (वृत्तसंस्था) – देशातील कोरोनाग्रस्तांचा वाढत आकडा सर्वांसाठीच चिंतेचा विषय बनला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला अटकाव करता यावा यासाठी देशभरामध्ये सध्या २१ दिवसांचा लॉक डाऊन लागू करण्यात आलाय. दरम्यान, आज केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी लॉक डाऊनचे पालन करण्यासंदर्भात सर्व राज्यातील आरोग्यमंत्र्यांना एक महत्वाची विनंती केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ६४१२ वर जाऊन पोहचला असल्याने देश कोरोना संक्रमणाच्या एका प्रमुख टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. कोरोनाला रोखायचे असल्यास सोशल डिस्टंसिंग हा एकमेव मार्ग असून सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी देशव्यापी लॉक डाऊन लागू करण्यात आलंय. असं असताना देखील काही राज्यांमध्ये नागरिक लॉक डाऊनच्या नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. याच पार्श्ववभूमीवर आज केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी सर्व राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना आपापल्या राज्यामध्ये लॉक डाऊनचे १०० टक्के पालन केले जाईल याची खबरदारी घेण्याची विनंती केली आहे. लॉक डाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्यास आपल्याला कोरोनाविरोधातील लढाई जड जाईल असं देखील त्यांनी यावेळी बोलताना सूचित केलं आहे. कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या ही महाराष्ट्रामध्ये असून राज्यात आतापर्यंत कोरोनाचे १३६४ रुग्ण आढळले आहेत.