मुंबई (वृत्तसंस्था) – लॉकडाऊनमध्ये वाधवान कुटुंबाच्या पर्यटन प्रकरणात सीबीआयची कोणतेही पथक दिल्लीतून महाबळेश्वर इथे दाखल झालेले नाही किंवा मुंबईहून कोणतेही पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी गेलेले नाही.तर या सगळ्यांना चौदा दिवसांच्या सरकारी क्वॉरन्टाईनमध्ये ठेवण्यात यावं आणि त्यानंतरही त्यांना कुठेही जाऊ देऊ नये, असे निर्देश सीबीआयने स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. बँक घोटाळ्याचा आरोप असलेले वाधवान बंधु कुटुंबासोबत लॉकडाऊन असतानाही महाबळेश्वरला पोहोचलं. महत्त्वाचं म्हणजे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांच्या परवानगीचे पत्र घेऊन वाधवान कुटुंबाने मुंबईहून महाबळेश्वरला गाडीतून प्रवास केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार वाधवान कुटुंबावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर या सीबीआयचं पथक त्यांची कोठडी घेण्यासाठी महाबळेश्वरला जाणार असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु सध्या तरी सीबीआयच्या पथकाला तिथे पाठवलेलं नाही. मात्र सीबीआयने साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून वाधवान बंधुंवरील गुन्ह्यांची आणि अजामीनपात्र वॉरंटची माहिती दिली. तसंच कुठेही जाण्यापूर्वी किंवा कोणतीही कारवाई करण्यापूर्वी वाधवान कुटुंबाने जिल्हाधिकाऱ्यांकडून नाहरकत प्रमाणपत्र घेणं आवश्यक असल्याचंही सीबीआयने सांगितलं.वाधवान कुटुंबापैकी काही जणांना कोरोनाव्हायरसची लागण झालेली असू शकते, अशी शंका सीबीआयला असल्याने हा निर्णय घेतला आहे. सीबीआय चौदा दिवसांच्या आत त्यांना कसं आणि कधी अटक करायची यासंदर्भात निर्णय घेणार आहे. दरम्यान, वाधवान बंधुंचा क्वॉरन्टाईनचा काळ संपल्यानंतर त्यांचा ताबा केंद्रीय गृहमंत्रालयाकडे सोपवला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे.