जळगाव – शहराच्या मध्यवर्ती भागात असणार्या व आमदार राजूमामा भोळे यांच्या कुटुंबियांची मालकी असणार्या नीलम वाईन्स या दुकानाचा परवाना आज रद्द करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
निलम वाईन्ससह जिल्ह्यातील काही वाईन शॉप्स आणि होलसेल ट्रेडर्सची काही दिवसांपूर्वी सखोल चौकशी करण्यात आली होती. यातआमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी माजी महापौर सीमा भोळे यांच्या नावावर असलेल्या पोलन पेठेतील नीलमवाईन्सचा परवाना गुरुवारी रद्द करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी ही कारवाई केली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या आठवड्यात नवी पेठेतील नीलम वाईन्स, नशिराबाद येथील रामा ट्रेडर्स, विजय सेल्स, गुजराल पेट्रोल पंपाजवळील एन.एन.वाईन्स, बांभोरी येथील विनोद वाईन्स व पाळधी येथील सोनी ट्रेडर्स या सहा दुकानांची तपासणी केली होती. त्यात या सहाही दुकानांमधील मद्यसाठ्यात तफावत आढळून आली होती व रेकॉर्डही अद्ययावत नव्हते. याबाबत अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सर्व दुकानांवर विसंगतीचे गुन्हे नोंदवून पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर सचिव अॅड.कुणाल पवार व महानगर युवक अध्यक्ष स्वप्नील नेमाडे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री दिलीप वळसे पाटील, विभागीय आयुक्त अ.ना.ओहोळ यांच्याकडे ईमेलद्वारे लेखी तक्रार केली होती.व जळगाव शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ता दिपक कुमार गुप्ता यांनाही तक्रार केली होती. यांची तक्रारीची दखल घेत दुकानांची तपासणी झाली होती.