मुंबई (वृत्तसंस्था) – भारतातील 90 टक्के नर्सना मस्क्युलोस्केलेटल पेनचा त्रास असल्याचा निष्कर्ष एका सर्व्हेक्षणातून पुढे आला आहे. जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने हा सर्व्हे करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या वर्षी नर्सेस आणि मिडव्हाइव्ह यांच्या कार्याची दखल घेण्याचे आणि समाज निरोगी ठेवण्यासाठी त्या बजावत असलेल्या महत्त्वाच्या भूमिकेचे स्मरण जगाला करून देण्याचे ठरवले आहे. या मध्यवर्ती संकल्पनेच्या अनुषंगाने, या सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून नर्सिंग आरोग्य कर्मचाऱ्यांसमोर असलेल्या वाढत्या आव्हानांवर उहापोह करण्यात आला आहे. हे समाजाचे काळजीवाहू आहेत, त्यांना कामाशी संबंधित ताण कमालीचा असतो, अतिरिक्त कामामुळे त्यांना थकवा येतो आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा प्रचंड तुटवडा असल्याने त्यांचे कामाचे तास लांबतात. अनेक तास उभे राहणे, आरामदायी नसलेल्या स्थितीमध्ये दीर्घ काळ काम करणे, रुग्णांना हाताळणे, अशी कामेही त्यांना मोठ्या प्रमाणात करावी लागतात. यामुळे त्यांना ‘मस्क्युलोस्केलेटलडिस ऑर्डर्स’चा मोठा धोका असतो. आजारी व्यक्तींची सेवा करणे, आरोग्याबाबत रुग्णांचे समुपदेशन करणे आणि संपूर्ण आरोग्यसेवा व्यवस्थेतील प्रक्रिया सुधारण्यासाठी प्रयत्न करणे, यासाठी नर्सेसना नेहमीच आघाडीवर राहावे लागते. नर्सिंग केअरची व्याप्ती रुग्णालयांपुरती मर्यादित नसते. त्यामध्ये होम केअर नर्सिंग, इंडस्ट्रीअल केअर नर्सिंग, कम्युनिटीहेल्थ नर्सिंग, मिलिटरी नर्सिंग आणि अन्य श्रेणींचाही समावेश असतो. परंतु, नर्सेसच्या भूमिकेमध्ये आणि कार्यामध्ये इतका विस्तार झाला असल्याने भारतातील नर्सना त्यांच्या कामाच्या ठिकाणी नवीन आव्हाने पेलावी लागत आहेत. नर्ससमोर असणारी आव्हाने सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी, गोदरेज इंटिरिओच्या संशोधनाच्या अभ्यासाने भारतातील नर्स सध्या ज्या वातावरणात काम करतात त्या वातावरणाचे आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीचे सविस्तर विश्लेषण केले आहे. नर्सेस या हेल्थ प्रोफेशनलची संख्या मोठी आहे. उपचार देणाऱ्या सर्व व्यवस्थेमध्ये, उपचारांमध्ये सुधारणा करणे, आधुनिक आरोग्य सेवा देणे आणि मूल्य देणे, या बाबतीत नर्सची भूमिका महत्त्वाची असते. रुग्णालयातील उपचारांव्यतिरिक्त अतिदक्षता आवश्यक असलेल्या रुग्णांना सेवा देण्यासाठी, तसेच घरी किंवा अन्य ठिकाणी सेवा देण्यासाठी नर्स योगदान देतात. आरोग्य प्रशिक्षक, समुपदेशक म्हणूनही नर्स काम करतात. आजार रोखण्यासाठी आणि वेलनेसला उत्तेजन देण्यासाठी त्या अन्यही भूमिका बजावतात. 90% पेक्षा अधिक नर्सना एमएसडी (मस्क्युलोस्केलेटलडिसऑर्डर) आहे, 61% नर्सना काही वेळा मानदुखीचा त्रास होतो. वारंवार होणारा (51%) त्रास म्हणजे पायदुखी, त्यानंतर गुडघ्यामध्ये वेदना होणे, हा त्रास सर्वाधिक प्रमाणात (51%) होतो. याचप्रमाणे, 51% नर्सनी पाठीच्या वरच्या आणि खालच्या भागाचे त्रास होत असल्याची तक्रार केली. वेदनेचा सामना करण्यासाठी दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये, 41% नर्सनी 1 ते 3 दिवस रजा घेतल्याचे, तर 7% नर्सनी 4 ते 6 दिवस रजा घेतल्याचे सांगितले. यामुळे, संबंधित संस्थेच्या उत्पादकतेवर परिणाम झाल्याचे दिसून येते. सर्वेक्षणातील निष्कर्षांनुसार, 88% नर्स दररोज 8-10 तास काम करतात, शिवाय त्या महिन्यातून किमान दोन वेळा किंवा तीन वेळा ओव्हरटाइम करतात. याचप्रमाणे, 74% नर्स दिवसातील 4 ते 6 तासांहून अधिक वेळ सलग उभ्या असतात. यामुळे त्यांच्या लोअर भागातील अवयवांवर ताण येतो. 20% नर्सनी महिन्यातून किमान दोनदा डबल-शिफ्ट ड्युटी केल्याचे सांगितले, 26% नर्सना महिन्यातून दोन वेळा त्यांच्या सुट्टीच्या दिवशी कामावर येण्याची विनंती करण्यात आली, तर 10% नर्सना महिन्यातून दोन वेळा त्यांच्या सुट्टीच्या दिवशी कामावर बोलावून घेण्यात आले. बदललेली व्यवस्था आणि नव्या जबाबदाऱ्या विचारात घेता, नर्सेसपुढील आव्हानांवर प्राधान्याने उपाय करणे आवश्यक आहे. साथीची लाट येण्यापूर्वीही भारतात 2 दशलक्ष नर्सचा तुटवडा होता. जागतिक आरोग्य संघटनेने हे 2019 मध्येच सांगितले होते. भारतामध्ये नर्स आणि रुग्ण असे गुणोत्तर प्रत्येकी 1000 रुग्णांसाठी केवळ अंदाजे 2.1 इतकेच आहे. देशात अशा प्रकारच्या काळजीवाहूंची तीव्र कमतरता असल्याने मनुष्यबळावर येणारा ताणही या सर्व्हेक्षणातून अभ्यासण्यात आला आहे.