नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – येस बँकेवरील निर्बंध पुढील तीन दिवसात म्हणजेच येत्या बुधवारी काढले जातील अशी दिलासादायक माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिली. येस बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी एसबीआय आणि इतर सात गुंतवणूकदारांनी पुढाकार घेतल्याने सरकारने बँकेवरील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. “केंद्रीय मंत्रिमंडळानं येस बँकेच्या पुनर्बांधणी योजनेला मंजुरी दिली आहे. भारतीय स्टेट बँक येस बँकेतील ४९ टक्के इक्विटी हिस्सा खरेदी करणार आहे. या अधिसुचनेच्या सात दिवसांच्या आत संचालक मंडळही स्थापन करण्यात येणार आहे,’ अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. सध्या येस बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले असून ग्राहकांना त्यांच्या खात्यातील ५० हजारांपर्यंतचीच रक्कम काढता येत आहेत.बँकेला कोणतीही गुंतवणूक करता येणार नाही, तसेच कोणतेही कर्ज देता येणार नाही किंवा कोणत्याही कर्जाचे पुनर्नवीकरण करता येणार नाही. कोणत्याही प्रकारची अदायगी बँकेला करता येणार नाही अशी बंधने होती. बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून स्टेट बँकेचे माजी अधिकारी प्रशांत कुमार यांनी बँकेचे प्रशासक म्हणून कार्यभार हाती घेतला आहे.खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय, एचडीएफसी बँक या दोन बँका येस बँकेत गुंतवणुकीसाठी पुढे सरसावल्या आहेत. तर कोटक मंहिंद्रा बँकेनेही येस बँकेत ६०० कोटी रूपये गुंतवण्याची घोषणा केली आहे.