जळगाव (प्रतिनिधी) – राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने २५ नोव्हेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावशी संबंधित रुग्णालयात वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याबाबत आदेश दिले आहे. मात्र हा आदेश वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाकडून का निघाला नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, नेत्रचिकित्सा विभागाच्या प्रमुखाचे पद रिक्त असल्याने वैद्यकीय मंडळ स्थापन करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहे.

आजारीपणाच्या सुटीवर असणारे सरकारी अधिकारी, कर्मचारी तसेच राज्यसेवेत दाखल होणाऱ्या उमेदवारांना नेमणुकीसाठी त्यांची निवड झाल्यावर वैद्यकीय तपासणीसाठी वैद्यकीय मंडळाकडे पाठविण्यात येते. तपासणीत ते वैद्यकीयदृष्ट्या बरे झाले असतील तर त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात येते. राज्यात आतापर्यंत १६ ठिकाणी वैद्यकीय मंडळे स्थापन करण्यात आली आहे. जळगावच्या नोकरदारांना धुळे येथे तपासणीसाठी जावे लागायचे. आता जळगाव येथे स्वतंत्र बोर्ड स्थापन करण्यास राज्य शासनाने २५ नोव्हेंबर रोजी मान्यता दिली आहे. त्यामुळे नोकरदारांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, हा आदेश शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला प्राप्त झालेला आहे. आदेशानुसार वैद्यकीय मंडळात औषधवैद्यकशास्त्र, शल्यचिकित्सा आणि नेत्रचिकित्सा विभागाचे प्राध्यापक मंडळात घेण्यास सांगितले आहे. त्यात एक महिला अधिकाऱ्यांचा समावेश करण्याची सूचना आहे. मात्र जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत्रशल्यचिकित्सा विभागाला प्रमुखच नसल्याने हा बोर्ड स्थापन करण्यात अडचणी आहे. तसेच, हा आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाकडून का आलेला नाही, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. वर्ग १ व २ च्या अधिकारी, कर्मचारी यांची तपासणी या वैद्यकीय मंडळात होते. तर वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांची तपासणी जिल्हा शल्यचिकित्सकांकडून करण्यात येते. दर सोमवारी वैद्यकीय मंडळाची बैठक आयोजित करण्याच्या सूचना आहेत.







