लोकप्रतिनिधी घटनास्थळी, जिल्ह्यात शोकाकुल वातावरण
जळगाव (प्रतिनिधी) : नेपाळ देशांमध्ये अबूखैरनीजवळ नदीमध्ये बस पडून जळगाव जिल्ह्यातील भाविक मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेतील २५ जणांचे मृतदेह गोरखपूर येथून जळगाव विमानतळावर दुपारी ४ वाजेच्या सुमारास येणार असल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि भुसावळचे आ. संजय सावकारे यांनी दुजोरा दिला आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे जखमींच्या भेटीसाठी काठमांडू येथील रुग्णालयात
उत्तर प्रदेश आणि नेपाळ देशांमध्ये देवदर्शनासाठी गेलेल्या भुसावळ तालुक्यातील भाविकांच्या बसला शुक्रवार दि. २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास बस घसरल्याने नदीत पडून भीषण अपघात झाला होता. या अपघातात चालक व क्लीनरसह २७ भाविक ठार झाले होते. यामुळे जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. दरम्यान या घटनेमध्ये चार कुटुंबातील परिवारावर काळाने घाला घातला आहे.
घटनास्थळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, भुसावळचे आ. संजय सावकारे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्यासह काही नागरिक गेले आहेत. दुपारी ३ वाजेच्या सुमारास उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून एअर ॲम्बुलन्सद्वारे सदर २५ मृतदेह घेऊन जळगाव विमानतळ येथे दुपारी ४ वाजेच्या सुमारास आणण्यात येणार आहेत. याबाबत आ. संजय सावकारे यांनी माहिती दिली असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही दुजोरा दिला आहे.
विमानतळावर उतरल्यानंतर तेथून भुसावळ तालुक्यातील वरणगाव, तळवेल येथील कुटुंबीयांच्या घरी मृतदेह नेले जाणार आहेत. त्यानंतर रात्री अंत्यसंस्कार केले जातील अशी शक्यता आहे.