जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील श्री नेहरू चौक बहुउद्देशीय मित्र मंडळातर्फे रविवारी १३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता जळगावच्या राजा श्री गणेशाचे पाटपूजन व मंडप सोहळा महानगरपालिकेच्या इमारतीखाली उत्साहात पार पडला. याप्रसंगी भाविकांनी ढोल ताशांच्या तालावर जल्लोष केला. यावेळी भाविकांच्या उत्साहात लक्षवेधी अशा ढोल पथकाचे उत्तम सादरीकरण झाले.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नेहरू चौक मित्र मंडळतर्फे रविवारी जळगावचा राजा श्री गणपती यांचे पाटपूजन व मंडप सोहळा आयोजित करण्यात आला होता. यंदाचे ३७ वे वर्ष आहे. धीरज व रुचिता अग्रवाल या दाम्पत्याच्या हस्ते पाटपूजन पवित्र मंत्रघोषात पार पडले. पाटपूजननंतर श्री गणपतीची महाआरती मान्यवरांच्या हस्ते झाली.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जनता बँकेचे संचालक ललित चौधरी, ओंकारेश्वर मंदिर ट्रस्टचे दीपक जोशी, माजी नगरसेवक अमित भाटिया, किशोर भोसले, श्री नेहरू चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी हे उपस्थित होते. महाआरती झाल्यानंतर आकर्षक असे शिवगंध संस्थेच्या ढोल पथकाचे सादरीकरण मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी नेहरू चौक रांगोळी व फुलांनी सुशोभित करण्यात आला होता. महिला व पुरुष भाविकांनी पारंपारिक वेशभूषामध्ये उपस्थिती दिली होती. कार्यक्रमाचे आभार मंडळाचे कार्यकर्ते यांनी मानले. कार्यक्रमासाठी श्री नेहरू चौक मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.