औरंगाबाद – औरंगाबादमध्ये वाळूज महानगर परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथील मातोश्री नगर येथे मंगळवार मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी दरोड्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून केला. हि घटना बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. भीमराव दिगंबर सावते (वय 35) असे मयत तरुणाचे असुन, तो आपल्या पत्नी व दोन मुलांसह मातोश्री नगर रांजनगाव शेनपुंजी येथे राहत होता.
त्याची पत्नी व मुले मागील तीन महिन्यांपासून गावाकडे गेली असल्यामुळे तो काल मंगळवारी घरी एकटाच होता. याचा फायदा घेत मंगळवारी मध्यरात्री अज्ञात आरोपींनी दरोड्याचा प्रयत्न करत त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून, त्याचा निर्घृण खून केला. त्यानंतर बुधवारी त्याची पत्नी व मुले गावाकडून परतली असता पत्नीला आपल्या पतीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आल्याने तिने तात्काळ पोलिसांकडे धाव घेत घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटीकडे रवाना केला. याबाबत पोलिसांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, मंगळवारी मध्यरात्री अज्ञात मारेकरी आणि मयतामध्ये झटापट झाली असावी आणि आरोपीने धारदार शस्त्राने वार करून त्याची निर्घृण हत्या केली असावी. दरम्यान घटनेची माहिती मिळतात वाळूज एमआयडीसी पोलीसांनी तात्काळ धाव घेतली. पुढील तपास पोलीस करीत आहे.