जळगाव एम.आय.डी.सी. पोलिसांची मोठी कारवाई
जळगाव (प्रतिनिधी): मकर संक्रांतीच्या काळात मानवी जीवन आणि पक्ष्यांसाठी घातक ठरणाऱ्या नायलॉन मांजाच्या विक्रीवर प्रशासनाने बंदी घातली असतानाही, छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्यांविरुद्ध जळगाव पोलिसांनी मोहीम उघडली आहे. एम.आय.डी.सी. पोलिसांनी अयोध्या नगर परिसरातील एका दुकानात छापा टाकून ६,३०० रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केला आहे.

एम.आय.डी.सी. पोलिसांना अयोध्या नगरमधील ‘श्री गणेश नॉव्हेल्टी’ दुकानात प्रतिबंधित मांजाची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे २ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४:२० वाजेच्या सुमारास पोलिसांनी तिथे छापा टाकला.या कारवाईत पोलिसांनी मनोज गणेश चीनावले (वय ३८, रा. म्हाडा कॉलनी, जळगाव) याला ताब्यात घेतले आहे. मोनो काईट मांजा: ४,२०० रुपये किमतीच्या ६ नायलॉन मांजाच्या रील, इतर नायलॉन मांजा: २,१०० रुपये किमतीच्या ३ इतर नायलॉन मांजाच्या रील अशा प्रकारे पोलिसांनी एकूण ६,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
संशयित आरोपी मनोज चीनावले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानवी जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. फिर्याद पोलीस हवालदार किशोर प्रल्हाद कुमावत यांनी दिली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार संजीव मोरे करत आहेत.









