जळगाव ( प्रतिनिधी ) – ‘‘ओमिक्रॉन’’मुळे संसर्गाचा अधिक धोका आहे. नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणुन मोठ्या प्रमाणात एकत्र न येता नूतन वर्ष 2022 चे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे अशी सूचना जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत शक्यतोवर घरीच साधेपणाने करावे. रात्री 9.00 ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत 5 पेक्षा अधिक व्यक्तीनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
31 डिसेंबर, 2021 व नूतन वर्ष 2022 चे स्वागताकरिता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलबध् आसनक्षमतेच्या 50 % पर्यंत तर खुल्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या 25% च्या मर्यादत उपस्थित राहण्यास परवानगी असेल. सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व Social Distancing राखले जाईल तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. त्या ठिकाणी निर्जुतूकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतोवर घराबाहेर जाणे टाळावे. 31 डिसेंबरच्या दिवशी नागरीकांनी बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) राहील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
नव वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही धार्मिक , सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणूकांचे आयोजन करण्यात येऊ नये.फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे. सुचनांचे पालन न केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 व भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल. असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कळविले आहे.