जळगाव शहरातील सुंदर मोती नगरातील घटना, माहेरच्या मंडळींचा आक्रमक पवित्रा
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील सुंदरमोती नगरात राहणाऱ्या २३ वर्षीय विवाहितेने कौटुंबिक छळ आणि मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना १० सप्टेंबर रोजी उघडकीस आली आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या मयुरीने राहत्या घरात गळफास घेऊन केल्याची घटना बुधवार दि. १० सप्टेंबर रोजी संध्याकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे तिच्या माहेरच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही, असा पवित्रा घेत नातेवाईकांनी गुरूवारी ११ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रचंड आक्रोश केला.
मयुरी गौरव ठोसर असे मयत विवाहितेचे नाव आहे. बुलढाणा जिल्ह्यातील पडाळी येथील मूळ रहिवासी असलेल्या मयुरीचा विवाह १० मे रोजी जळगावातील गौरव ठोसरसोबत झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच तिचा छळ सुरू झाला. सासरच्या मंडळींकडून छोट्या-छोट्या गोष्टींवरून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. इतकंच नव्हे, तर तिच्याकडून पैशांची मागणीही केली जात होती. मयुरीचा पती गौरव हादेखील तिला शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याचं तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी सांगितलं. या त्रासाला कंटाळून मयुरीने तिच्या आई-वडिलांना ही गोष्ट सांगितली.
त्यांनी काही पैसे देऊन हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण काही दिवसांनी पुन्हा छळ सुरू झाला. मयुरीचा वाढदिवस ९ सप्टेंबर रोजी होता. तिच्या भावाने वाढदिवस साजरा करण्यासाठी तिला पैसे दिले होते आणि तो साजराही झाला होता. वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी, १० सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता, घरात कुणी नसताना मयुरीने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तिला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
या घटनेची माहिती मयुरीचे वडील भगवान बुडूकले यांना मिळताच, ते कुटुंबासह ११ सप्टेंबर रोजी जळगावात दाखल झाले. हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर मयुरीची आई, वडील आणि भाऊ यांनी प्रचंड आक्रोश केला. आपल्या मुलीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचा आरोप करत त्यांनी पती, सासू, सासरे, दीर आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली. जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.