नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – नवरा घरी आलाय, त्याला पकडा, पण गोळी घालू नका, आज करवा चौथ आहे असे सांगत फरार आरोपीच्या पत्नीने पोलिसांना टीप दिली
उत्तर भारतात करवा चौथच्या दिवशी पत्नी पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास ठेवते. चंद्रोदयानंतर पतीचे दर्शन घेऊन पत्नी उपवास सोडते. मात्र दिल्लीतील विवाहितेने चक्क करवा चौथच्या दिवशी फरार पतीला पोलिसांच्या स्वाधीन केले. महिलेने पोलिसांना फोन करुन तो घरी आल्याची टीप दिली.
19 ऑक्टोबररोजी सकाळी दिल्लीतील नजफगड भागातील राम बाजार येथील दुकानात आरोपीने मायलेकीवर गोळीबार केल्याचा आरोप आहे. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला, तर तिची मुलगी जखमी आहे. गोळीबारानंतर आरोपी पसार झाला होता. पत्नीने फोनवरुन दिल्ली पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
द्वारकाचे डीसीपी शंकर चौधरी यांना रविवारी एक फोन आला. पलिकडून महिलेने सांगितले की, माझा नवरा आला आहे, त्याला तुम्ही पकडा. मात्र आज करवाचौथ असल्याने मी नवऱ्यासाठी उपवास ठेवला आहे, त्यामुळे कृपया त्याला गोळी मारु नका, असं आर्जव महिलेने केलं. आरोपी राजीव गुलाटी गोळीबाराची घटना घडल्यानंतर फरार होता. राजीव गुलाटी आणि पीडित कुटुंबामध्ये मालमत्तेसंदर्भात वाद सुरु होता. गुन्हा घडल्यावर त्याच्या शोधात पंजाब, हरियाणा, दिल्लीसह अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत होते.
करवा चौथच्या दिवशी राजीव पत्नीला भेटण्यासाठी घरी पोहोचला. राजीव घरी पोहोचताच त्याच्या पत्नीने पोलिसांना फोन केला. डीसीपी चौधरी यांनी स्वतः राजीव गुलाटी याची कॉलर पकडून त्यांना घराबाहेर खेचत नेले. राजीवकडून हत्येसाठी वापरलेले हत्यारही पोलिसांनी जप्त केले आहे.