नवी दिल्ली (वृत्तसंथा) – सीएएवरून सुरू झालेला दिल्लीतील हिंसाचार आता थांबला असला तरी अफवांचे पेव फुटले आहे. रविवारी सायंकाळी सुमारे ७ वाजता अनेक भागांत हिंसाचाराच्या अफवा पसरल्या. शाहीनबागमध्ये प्रचंड तणाव असल्याची अफवा पसरताच पोलिस पोहोचले. परिस्थिती शांत होती तरीही टिळकनगर, नांगलोई, सूरजमल स्टेडियम, बदरपूर, तुघलकाबाद, उत्तमनगर आणि नवादा मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले.
रात्री पोलिसांनी सर्व भागांत शांतता असल्याचे ट्विट केले. यानंतर मेट्रो स्टेशन्स उघडण्यात आले. शाहीनबागमध्ये निदर्शनानजीक दोन गट भिडल्याने कलम १४४ लागू करण्यात आले. हिंदू सेनेने १ मार्चला रस्ता मोकळा करण्यासाठी निदर्शने करण्याचे जाहीर केले होते. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर तो निर्णय मागे घेतला. दंगलग्रस्त ईशान्य दिल्लीत रविवारी शांतता होती. आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनीही दंगलग्रस्त भागाला भेट देऊन शांततेचे आवाहन केले.
ईशान्य दिल्लीत रविवारी नाल्यात ३ मृतदेह सापडले. मात्र, ते दंगलीतील मृतांचेच आहे का हे निश्चित नाही. हे लोक दंगलीत मारले गेले असतील तर मृतांची संख्या ४६ वर जाईल. शाहीनबागमध्ये हिंसाचार झालेल्या ख्याला-रघुबीरनगर इत्यादी भागांत अफवा होत्या. यावर पोलिसांनी दिल्लीत पूर्णपणे शांतता असल्याचे जाहीर केले. त्यानंतर मेट्रो स्टेशन्स उघडण्यात आले.
सीएएच्या विरोधात देशातील अनेक भागांत अजूनही निदर्शने सुरू असून अलिगडमध्ये जीवनगड भागात सीएएविरुद्ध सहा दिवसांपासून धरणे धरलेल्या निदर्शक महिलांना शनिवारी पोलिसांनी हुसकावून लावत रस्ता मोकळा केला. यानंतर महिलांनी पुन्हा हा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. या भागात परिस्थिती तणावपूर्ण असली तरी हिंसक प्रकार घडलेले नाहीत.
शिलाँग-मेघालयात ईस्ट खासी हिल्स जिल्ह्यात रविवारी पहाटे अज्ञात लोकांनी एकाची घरात घुसून हत्या केली. यामुळे आदिवासी व बिगर आदिवासींमध्ये पेटलेल्या संघर्षातील मृतांची संख्या ३ झाली. राज्यात सध्या सहा जिल्ह्यांमध्ये मोबाइल इंटरनेट बंद आहे. शनिवारी लागू करण्यात आलेली संचारबंदी रविवारी सकाळी शिथिल करण्यात आली. मात्र, अजूनही परिस्थिती तणावपूर्ण आहे.
‘गोली मारो’वरून भडकले केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर : दिल्लीत हिंसाचार भडकावणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे. ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी “…गोली मारो गद्दारों को’ असे भडक वक्तव्य केले होते. या वक्तव्याबद्दल पत्रकारांनी विचारताच ते भडकले. यासंबंधीचे प्रकरण सध्या न्यायालयात असल्याने यावर काहीही भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.