जळगाव (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केल्यानंतर आता एकनाथराव खडसे हे आक्रमकपणे भाजपच्या विरोधात प्रचार, प्रसार करीत आहेत. भाजपचे कार्यालय असलेल्या “वसंत स्मृती” येथील त्यांचा फोटो काढण्यात आला असून ते आता भाजप स्मृतीतूनही बाहेर गेले आहेत.


भारतीय जनता पक्षात गेले चाळीस वर्षे पक्षाच्या सदस्यपासून मंत्री पदापर्यंत राहिलेले ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी 22 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केल्यावर भाजपने देखील त्यांच्याबाबतीत आता विरोधी पवित्रा घ्यायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याबद्दल असलेला आदर पाहता भाजपचे जिल्हा कार्यालय “वसंत स्मृती” येथे आदरणीय एकनाथराव खडसे यांचा जुना फोटो पक्षप्रवेश झाल्यानंतरही काही दिवस ठेवण्यात आला होता.
प्रसंगी आमदार सुरेश भोळे यांनी नाथाभाऊ आजही आमच्या मनात अशी प्रतिक्रिया दिली होती. पण शनिवारी हा फोटो काढण्यात आला असल्याचे कळत आहे. त्याचबरोबर त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव स्वर्गीय निखील खडसे यांचाही असलेला फोटो भाजपच्या वसंत स्मृती मधून बाहेर झाला आहे. हा फोटो कोणी काढला, कोणाच्या आदेशान्वये काढला गेला याबाबत माहिती मिळत नसून महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्याशी सातत्याने संपर्क साधण्यात येत आहे.







