राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची स्थिती “एक ना धड भाराभर चिंध्या”
जळगाव (प्रतिनिधी) : माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे विधानपरिषदेतील गटनेते एकनाथराव खडसे यांच्या संभ्रमित भूमिकेमुळे कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस मधील पदाधिकारीदेखील वैतागलेले पाहायला दिसून येत आहेत. वर्षभरापूर्वी मजबूत असलेली राष्ट्रवादी आता विखुरली गेलेली आहे. शरद पवार गटातील नेत्यांना तर त्यांची पक्षातील भूमिका काय याबाबत संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. सर्व नेत्यांना आता एकसंध करण्यासाठी थेट प्रदेशाध्यक्षांनाच जळगावी मुक्काम ठोकावा लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
लोकसभेच्या रावेरच्या जागेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एकनाथराव खडसे यांनी सुरुवातीला लढण्याची तयारी दर्शविली होती. मात्र नंतर भाजपाने रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे एकनाथरावांनी वैद्यकीय कारण देऊन निवडणूक लढवीत नसल्याचे सांगितले. तसेच, बारामतीप्रमाणे नणंद-भावजय लढत रावेर मतदारसंघात पाहायला मिळेल असे चित्र दिसत असताना मात्र रोहिणी खडसे यांनी लोकसभेऐवजी विधानसभा लढणार असल्याचे सांगितले. त्यामुळे रक्षा खडसे यांच्याविरोधात खडसे घराणे तुतारी चिन्हावर लढणार नसल्याचे स्पष्टच झाले.
मात्र त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खळबळ उडाली. खडसेंनी माघार घेतल्यामुळे आता उमेदवार कोण हा महत्वाचा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर उभा ठाकला आहे. येथे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, भुसावळ येथील माजी नगराध्यक्ष संतोष चौधरी यांच्यासह श्रीराम पाटील, विनोद सोनवणे, विनोद तराळ यांची नावे चर्चिली गेली आहेत. आता एकनाथराव खडसे यांच्या माघारीमुळे आधीच संभ्रमित असलेल्या राष्ट्रवादीला दुसरा धक्का मिळताना दिसत आहे. खडसेंनी नुकताच दिल्लीचा केलेला दौरा हा चर्चेचा विषय ठरला आहे.
आता खडसे भाजपात घरवापसी करणार म्हणून सुरु असलेली चर्चा पुन्हा संभ्रमात टाकणारी ठरली आहे. तसेच, भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या विरोधात एकनाथराव हे प्रचार करणार नाहीत अशी माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे एकनाथराव खडसे यांच्याबाबत आता पक्षातच नाराजी निर्माण झाली आहे. तसेच, राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांना तर त्यांची पक्षामध्ये नेमकी भूमिका काय हेच समजून येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. “एक ना धड भाराभर चिंध्या” अशी परिस्थिती असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाच जळगावात तळ ठोकून पक्षाची स्थिती सावरावी लागणार आहे.