जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील नशिराबाद येथे दुचाकीस्वार आडवा आल्याने झालेल्या अपघातात कारचालक व त्याचा मित्र जखमी झाला आहे. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस घटनास्थळी माहिती घेत आहेत.
आकाश भीमराव वाघमारे (वय २५), सुशील नरेंद्र वाघमारे (वय २२) दोन्ही रा. नशिराबाद असे जखमींची नावे आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, रविवारी ३० जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास नशिराबाद जवळ आकाश वाघमारे कार चालवत असताना एक दुचाकीस्वार अचानक मध्ये आला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार डीवाईडरला धडकली.
त्यात दोघे जखमी झाले. यात आकाश वाघमारे याच्या चेहऱ्यावर व अंगावर जबर जखमा झाल्या असून सुशील वाघमारे याला किरकोळ मार, मुक्कामार लागला आहे. त्यांना उपचारासाठी नागरिकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. नशिराबाद पोलिस घटनास्थळी माहिती घेत आहेत.